बीड - वीटभट्टी चालकाशी जवळीक साधून त्याला घरी बोलावून अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत 15 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सात जणांविरूद्ध बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी, की केज तालुक्यातील टाकळी येथील वीटभट्टी चालक नितीन रघुनाथ बारगजे यांना आष्टी येथील एका महिलेचा विटा पाहिजेत म्हणून फोन आला. तुम्ही मांजरसुंब्याला या असे त्या महिलेने शुक्रवारी सकाळी सांगितले. दरम्यान, सकाळी अकराच्या सुमारास नितीन बारगजे हे मांजरसुंबा येथे गेले. याठिकाणी सदर महिलेशी बोलणे झाल्यानंतर या महिलेने मला पाटोद्याला जायचे आहे. गाडी नसल्यामुळे तुम्हीच नेऊन सोडा असा आग्रह केला. तेथे गेल्यानंतर पुढे आष्टी येथे सोडा असे सांगितले. आष्टी येथे गेल्यानंतर या महिलेने नितीन बारगजे यांना चहा पिण्यासाठी घरी चला असा आग्रह केला.
नितीन बारगजे हे घरी गेल्यानंतर या महिलेने घराचे दार लावून यांच्याशी लगट केली याचे चित्रीकरण दुसऱ्या एकाने केले. हे अश्लिल छायाचित्रीकरण व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी देत त्यांच्याकडे पंधरा लाख रुपयाची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर दहा लाख रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम घेण्यासाठी केज येथे जाण्याचे नियोजन करण्यात आले. केजला जाण्यासाठी बारगजे यांच्यासोबत शेखर वेदपाठक हा मोटरसायकलवर आणि त्यांच्यामागून काहीजण स्कॉर्पिओ गाडीतून निघाले. शनिवार (25 जुलै) च्या दिवशी केज येथे आल्यानंतर बारगजे यांनी मित्राच्या मदतीने वेदपाठकला पकडले. यावेळी पाठीमागून आलेले स्कार्पिओ गाडीतील लोक न थांबता झालेला प्रकार पाहून निघून गेले.