महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शुद्धीकरण केलेले पाणी फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे होतेय दूषित

शहराला पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी फिल्टरकरून संपूर्ण बीड शहराला दिले जाते. मात्र, बीड शहरात ठिकठिकाणी अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या फुटल्याने नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा विशेष आढावा...

By

Published : Dec 12, 2020, 12:53 PM IST

Water purification
जलशुद्धीकरण

बीड - तीन लाखांपेक्षा जास्त नागरिक बीड शहरात राहतात. बीड शहराला एक वेळाचा पाणी पुरवठा करण्यासाठी 28 एमएलडी म्हणजेच 2 कोटी 80 लाख लिटर पाणी लागते. दरडोई 90 लिटर प्रमाणे बीड नगरपालिका पाणी पुरवठा करते. नळाला येणारे पाणी अनेक वेळा दुषित असते, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांच्या आहेत.

बीड शहराला मिळणारे पाणी शुद्धीकरण करूनही दुषित येते

शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या फुटलेल्या आहेत. जरी नगरपालिका बीडकरांना शुद्ध पाणी देत असल्याचे सांगत असली, तरी जलवाहिन्या लिकेजमुळे अनेक नागरिकांना दुषित पाणी मिळते. किमान आम्हाला चांगले पाणी, चांगले रस्ते व वेळेवर वीज नगरपालिकेने द्यावे, एवढीच आमची अपेक्षा असल्याचे रहिवासी रुक्मिणी नागापुरे यांनी सांगितले.

पाणी शुद्धीकरणासाठी लाखो रुपयांचा होतो खर्च -

बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी फिल्टर करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारलेली आहे. शहराला दोन ठिकाणावरून पिण्याचे पाणी आणले जाते. यामध्ये माजलगाव बॅक वॉटर व बिंदुसरा प्रकल्प यांचा समावेश आहे. जेव्हा हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रावर येते, तेव्हा त्या पाण्यातील क्षार बाजूला काढून पाणी फिल्टरकरून नंतरच पाणी सोडले जाते. केवळ पाणी फिल्टर करण्याचा खर्च 3 लाख रुपयांहून अधिक आहे, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता राहुल टाळके यांनी दिली.

पाणी नेमके कुठे दुषित होते?

जलशुद्धीकरण केंद्रावर अत्यंत काळजीपूर्वक पिण्याचे पाणी फिल्टर केल्यानंतर त्या पाण्याची एक वेळा तपासणी केली जाते. त्यानंतर ते पाणी पिण्या योग्य असल्याची खात्री करूनच बीड शहराला वितरीत केले जाते. मात्र, जलशुद्धीकरण केंद्रावरून शहराच्या अंतर्गत भागात पिण्याचे पाणी वाहून नेणाऱया जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटलेल्या आहेत. त्यामुळे शुद्ध व स्वच्छ पाणी पुन्हा दुषित होते. या सगळ्या प्रकारामुळे बीडकरांना दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. दुषित पाण्याचा परिणाम जसा नागरिकांवर होतो, तसाच 6-7 वर्षाच्या वयोगटातील बालकांवर देखील होतो. गॅस्ट्रो, कावीळ यासारखे आजार दुषित पाण्यामुळे उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातील पाणी उकळून पिलेले केव्हाही चांगले, असे डॉ. हनुमंत पाखरे म्हणाले.

खटाटोप खूप मात्र, व्यर्थच -

बीड नगरपालिकेने शहराच्या अंतर्गत 248 किलोमीटरची पाणीपुरवठा वितरण व्यवस्था निर्माण केलेली आहे. एका महिन्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारे लाईट बिल 35 लाख रुपये येते. तर, पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलसाठी महिन्याकाठी 3 ते 4 लाख रुपयांचा खर्च केला जातो. याशिवाय जलशुद्धीकरण केंद्रावर काम करणारे अधिकारी-कर्मचारी यांच्याही वेतनाचा खर्च केला जातो. मात्र, हा सगळा खटाटोप करून देखील केवळ लीक असलेल्या जलवाहिन्यांमुळे बीडकरांना दुषित पाण्यावरच तहान भागवावी लागते. याकडे पालिका प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी बीड शहरातील नागरिकांची आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details