बीड - "शरद पवार शिखर बँकेचे संचालक नसतानाही ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भाजप सरकार खोटे बोलत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र भाजपने रचले आहे", असा घणाघाती आरोप माजी आमदार उषा दराडे यांनी केला. शरद पवार यांच्यावरील गुन्हा ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांना निवेदनदेखील देण्यात आल्याचेही दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.
शरद पवारांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या; बीड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी - शिखर बँक घोटाळा
शरद पवार यांच्यावरील गुन्हा ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केली. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांना निवेदनदेखील देण्यात आल्याचेही माजी आमदार उषा दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -...तर शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात जावे - किरीट सोमैया
माजी आमदार राजेंद्र जगताप, सुनील धांडे, सय्यद सलीम हेदेखील यावेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना उषा दराडे म्हणाल्या की, जातीयवादी पक्षाला शह देण्याची क्षमता शरद पवार यांच्यामध्ये आहे. म्हणून, जाणीवपूर्वक त्यांना गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा घाणेरडा प्रयत्न मुख्यमंत्री आणि भाजप करत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड केले. तरीदेखील एकाही मंत्र्यांवर कारवाई झाली नाही. मात्र, शिखर बँकेवर संचालक सुद्धा नसलेल्या शरद पवारांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.