आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी खासदार प्रितम मुंडेंची कोविड सेंटरला भेट
बीड जिल्ह्यात परळीसह इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनातर्फे 'मिशन झिरो' अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खा. मुंडे यांनी परळी शहरातील कोविड सेंटरा भेट दिली.
बीड- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे यांनी परळी शहरातील कोविड सेंटरला भेट देऊन मंगळवारी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यात परळीसह इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनातर्फे 'मिशन झिरो' अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खा. मुंडे यांनी परळी शहरातील 'अँटीजेन टेस्ट' केंद्रांना आज भेट देऊन नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधला व मिशन झिरोसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
परळी शहरातील नटराज सभागृह, सुभाष चौक परिसरातील सरस्वती विद्यालय व माळी वेस भागातील अँटीजेन टेस्ट केंद्रांना भेट देऊन मुंडे यांनी नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्था व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. तर नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी अँटीजेन टेस्ट केंद्रांवर टेस्टिंग टेबल्स वाढवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी प्रशासनाला केल्या.
परळी शहरातील बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथील कोविड सेंटरला भेट देऊन मुंडे यांनी कोविड सेंटरचा आढावा घेऊन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व सद्यस्थितीची माहिती घेतली. “कोरोनाच्या संकटात स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून अतिशय चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या कोविड योद्धयांच्या मला अभिमान वाटतो, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या" अशा शब्दांत प्रितम मुंडे यांनी कोविड योद्धयांचे मनोधैर्य वाढवले.