बीड- जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे, मात्र या लॉकडाऊनला वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लॉकडाऊनचा निषेध करत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लॉकडाऊनच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. यातच बीडची जिल्हा आरोग्य यंत्रणा ढिसाळ असल्याने गोरगरीब नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देखील मिळत नाही. मात्र अशा बिकट परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याऐवजी प्रशासन लॉकडाऊन लावत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात आजपासून 10 दिवसांसाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा निषेध करण्यासाठी वंचितच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत नो लॉकडाऊनचे फलक झळकावले. दरम्यान आंदोलन करणाऱ्या वंचित आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह