बीड - बीड शहरातील व्यापाऱ्यांची रॅपीड अँटीजनिक टेस्ट करण्याच्या उद्देशाने 8 ते 10 ऑगस्ट हे तीन दिवस बीड शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.
बीडची बाजारपेठ तीन दिवस बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश
बीड शहरातील नागिरक, व्यापारी आणि कर्मचारी यांची रॅपिड अँटीजनिक टेस्ट 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान केली जाणार आहे. यासाठी शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.
बीड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवार पर्यंत बीड जिल्ह्यात एक हजार पेक्षा अधिक पॉझिटिव रुग्णांची संख्या आहे. बीड शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदाराचे फळ- भाजी विक्रेते, दुध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकेमधील कर्मचारी, यांच्या कोरोनाची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांची दुकाने 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहेत.
नगर पालिकेच्या स्वच्छता निरिक्षकाव्दारे नेमलेल्या ठिकाणी तपासणीसाठी व्यापाऱ्यांनी जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विशेष म्हणजे शहराबाहेरुन येणा-या दूध विक्रेत्यांची तपासणी त्यांच्या गावच्या ग्रामसेवकांनी त्यांना दिलेल्या ठिकाणी करण्याचे नियोजन देखील केले आहे. या सर्व प्रक्रियासाठी 7 ऑगस्ट रोजी व्यापाऱ्यांनी आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.