महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंडे बहिण-भावाच्या प्रतिष्ठेची लढाई, प्रीतम विक्रमाची पुनरावृत्ती करणार की सोनवणे चमत्कार घडवणार? - बीड लोकसभा मतदारसंघ

वाढत्या उन्हाबरोबरच बीड लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप व मित्र पक्षाकडून डॉ. प्रीतम मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून बजरंग सोनवणे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक विष्णू जाधव यांना उमेदवारी दिली आहे. प्रचाराची रणधुमाळी दुसऱ्या टप्प्यात आहे.

भाजपच्या उमेदवार डॉ. पंकजा मुंडे आणि आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे

By

Published : Apr 4, 2019, 1:33 PM IST

Updated : Apr 5, 2019, 9:42 AM IST

बीड -लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बीड लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. या मतदारसंघामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघामध्ये राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी युतीच्या उमेदवारासाठी आणि विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आघाडीच्या उमेदवारासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या मतदारसंघात युतीकडून भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे मैदानात उतरलेत. संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले असून, अत्यंत तुल्यबळ अशी ही लढत समजली जात आहे.

बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा

वाढत्या उन्हाबरोबरच बीड लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप व मित्र पक्षाकडून डॉ. प्रीतम मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून बजरंग सोनवणे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक विष्णू जाधव यांना उमेदवारी दिली आहे. प्रचाराची रणधुमाळी दुसऱ्या टप्प्यात आहे. भाजपकडून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे राष्ट्रवादीची सगळी सूत्रे आहेत. २०१९ ची निवडणूक या दोन्ही बहीण-भावांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मतदारसंघाची पार्श्वभूमी

बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत ७ वेळा काँग्रेसचे वर्चस्व राहीले आहे. तर पीडीएफ, जद, भाकप आणि माकप प्रत्येकी एक वेळा खासदार झाला आहे. तर भाजपने या मतदारसंघात ३ वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. २००९ च्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे हे पहिल्यांदाच लोकसभेत गेले होते. त्यावेळी त्यांना ५ लाख ५३ हजार ९९५ मते मिळाली होती. यावेळी मुंडेंनी राष्ट्रवादीच्या रमेश आडसकर यांचा पराभव केला होता.

२०१४ ची परिस्थिती

२०१४ च्या निवडणुकीत गोपानाथ मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्यात लढत झाली होती. यामध्ये गोपीनाथ मुंडेंचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला होता. ३ जून २०१४ ला गोपीनाथ मुंडेंचे निधन झाल्यानंतर त्या जागेची पोटनिवडणूक लागली. त्यावेळी भाजपकडून डॉ. प्रितम मुंडेंना निवडुकीत उतरविण्यात आले. यावेळी त्यांच्याविरोधी काँग्रेसच्या अशोक पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये प्रितम मुंडेंचा तब्बल ७ लाख मताधिक्क्यानी विजय झाला होता.

मतदारसंघातील प्रश्न

२०१४ च्या निवडणुकीमध्ये भावनिक मुद्दा कळीचा ठरला होता. मात्र, २०१९ ची लोकसभा निवडणूक पूर्णतः वेगळ्या मूडमध्ये आहे. आता विरोधक केवळ विकासावर बोला म्हणून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. २०१९पर्यंत बीडला रेल्वे येईल अशी अपेक्षा होती. मात्र, बीड जिल्ह्याच्या बॉण्ड्रीपर्यंतच रेल्वे आणण्यात भाजपच्या खासदारांना शक्य झाले आहे. विरोधक या मुद्यावर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न साडेचार वर्षात सुटले नसल्याचा दावा विरोधक करत आहेत. याला उत्तर देण्यापेक्षा भाजप भावनिक राजकारणाचे मुद्दे रेटत आहे.

मतदारसंघातील पक्षीय बलाबल

बीड लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. ६ पैकी ५ ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. तर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.

  1. बीड - जयदत्त क्षिरसागर ( राष्ट्रवादी)
  2. माजलगाव - आर. टी. देशमुख (भाजप)
  3. परळी - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (भाजप)
  4. केज - संगीता ठोंबरे ( भाजप)
  5. आष्टी - भिमराव धोंडे (भाजप)
  6. गेवराई - अॅड. लक्ष्मण पवार (भाजप)

माजलगाव विधानसभा मतदारसंघात आर. टी. देशमुख व केज विधानसभा मतदारसंघातून संगीता ठोंबरे या दोन्ही भाजप आमदारावरील नाराजी कार्यकर्त्यांनी यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्यासमोर बोलून दाखवली आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार लक्ष्मण पवार यांच्या बरोबरच शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गेवराईमध्ये पवार-पंडित हे समीकरण किती लागू होईल हे सांगणे कठीण आहे. तर आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार भीमराव धोंडे हे प्रीतम मुंडेंच्या प्रचाराला लागले आहेत.

मतदार संख्या -

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात २० लाख २८ हजार ३३९ मतदार आहेत. यामध्ये १० लाख पुरुष तर ९ लाख स्त्री मतदार आहेत. यामध्ये ७ तृतीयपंथी मतदार आहेत. २०१४ च्या तुलनेत यावेळी १ लाख ९४ हजार नवमतदारांची नोंदणी झालेली आहे.

'या' नेत्यांच्या राजकीय भूमिका ठरणार महत्त्वाच्या -

बीड लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षांमध्ये गट-तट आहेत. अंतर्गत गटबाजीला पॅचअप करण्याचे मोठे आव्हान निवडणुकीच्या रिंगणात उभारलेल्या उमेदवारांसमोर आहे. भाजपबरोबर मित्रपक्ष म्हणून राज्यभर प्रचार करणारे शिवसंग्रामचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघ पंकजा मुंडेंपासून फारकत घेतली आहे. माध्यमांना दिलेला प्रतिक्रियेमध्ये आमदार विनायक मेटे म्हणाले होते की, राज्यात मी भाजपसोबत असलो तरी बीड जिल्ह्यात मात्र भाजपचे उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचे काम करणार नाही. ही दुटप्पी भूमिका भाजपमध्ये मित्र पक्षांतील नेत्यांमध्ये आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत. आतापर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही जाहीर कार्यक्रमात आलेले नाहीत. याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना बसू शकतो. ५ एप्रिल रोजी कार्यकर्ता मेळावा घेऊन जयदत्त क्षीरसागर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आमदार जयदत्त क्षीरसागर यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नाही. मात्र, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते व आमदार क्षीरसागर यांच्यातील राजकीय वैर त्यांना एकत्र येऊ देत नाही. भाजपने आतापर्यंत कुठल्याच निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले नसल्याची खंत मनात ठेवून शिवसेनेतील एक गट बीडमध्ये भाजपच्या विरोधात काम करत आहे. या गटाची मनधारणी करण्यासाठी करण्यासाठी पंकजा मुंडेंनी पुढाकार घेतला होता. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.

Last Updated : Apr 5, 2019, 9:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details