बीड- आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामला जिल्ह्यात पुन्हा एक राजकीय हादरा बसला आहे. शिवसंग्रामच्या तिकिटावर निवडून आलेले नेकनूरचे जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसंग्रामकडे एकही जिल्हा परिषद सदस्य शिल्लक राहिला नसल्याने एकंदरीत या राजकीय घडामोडीनंतर शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का समजला जात आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात शिवसंग्रामचे विनायक मेटे विरुद्ध मंत्री पंकजा मुंडे यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्री 'महाजनादेश' यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात आले होते. त्यावेळी विनायक मेटे व पंकजा मुंडे यांच्यातील गटबाजी उफळून आली होती. विशेष म्हणजे, आमदार विनायक मेटे यांनी काकडहिरा येथे ठेवलेल्या कार्यक्रमादरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात काही घोषणाबाजी झाली होती. या सगळ्या परिस्थितीचा वचपा काढण्यासाठी पंकजा मुंडे यांनी गुरुवारी शिवसंग्रामकडे असलेले जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन विनायक मेटेंना दणका दिला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.