अंबाजोगाई: 'स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयासह प्रत्येक रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा आहे. या कठीण परिस्थितीत डॉक्टर्स व अन्य सर्व यंत्रणांनी आपला पूर्ण अनुभव, आपले कौशल्य पणाला लावावेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्भवलेली ही परिस्थिती आटोक्यात आणणे हे आपल्या जीवनातील सर्वात मोठे आव्हान आहे, असे समजून प्रत्येकाने काम करावे', असें आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
कोविड विषयक विविध समस्या व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात मुंडेंनी आज (23 एप्रिल) अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. स्वाराती रुग्णालयातील A बिल्डिंगमधील उर्वरित कामे चार दिवसांच्या आत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून घ्यावीत व ही संपूर्ण इमारत कोविड रुग्णांसाठी आरक्षित करून सोमवारपासून सुरू झालीच पाहिजे, असे सक्त निर्देश मुंडेंनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी व महाविद्यालय प्रशासनाला दिले आहेत.
स्वाराती रुग्णालयात आवश्यक ऑक्सिजन मिळवण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्रातून शिफ्ट केलेला ऑक्सिजन प्लांट सोमवारच्या आत उभा राहील. याद्वारे 288 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन रोज निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले. तसेच, या व्यतिरिक्त लागणाऱ्या ऑक्सिजनची व्यवस्था करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी धनंजय मुंडे यांनी बैठकीतच फोनवरून संवाद साधत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना केल्या. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा भासत असताना, या सुविधांचा योग्य वापर व्हावा, अपव्यय होऊ नये. तसेच गरज असणाऱ्या रुग्णांनाच ते दिले जावेत, याबाबत खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचनाही मुंडेंनी दिल्या.
स्वाराती परिसरामध्ये उपलब्ध जागेत आणखी एक ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असेही यावेळी मुंडे म्हणाले.