परळी (बीड)- जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. यातील तीन हजार इंजेक्शन परळी मतदारसंघातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना उपलब्ध होणार आहे. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत ही इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत.
बीड जिल्ह्यात दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन होणार उपलब्ध - नाथ प्रतिष्ठान परळी
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. यातील तीन हजार इंजेक्शन परळी मतदारसंघातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत मोफत उपलब्ध करून देणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. तसेच इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये औषध प्रशासन विभागामार्फत आवश्यक इंजेक्शन उपलब्ध करण्यात येतात. मात्र खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्ण व नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी औषध प्रशासन विभाग, उत्पादक व वितरक यांच्याशी समन्वय साधून शासन नियमांच्या अधीन राहून जिल्ह्यासाठी आगाऊ 10 हजार इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. हे इंजेक्शन शासकीय यंत्रणेद्वारे वितरकांमार्फत खासगी रुग्णालय व नातेवाईकांना दिली जाणार आहेत.