बीड - महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झाल्याचे काही रुग्ण आढळले आहेत. या विषाणूपासून बचावासाठी खबरदारी म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. यासाठी बीडमधील आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे होणारी भैरवनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंचायत समिती सभापती माधुरी जगताप यांनी सर्व गावकऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
कोरोनामुळे टाकळसिंग यात्रा रद्द, गावकऱ्यांनी मिळून घेतला निर्णय हेही वाचा...कोरोनामुळे सैलानी यात्रा रद्द झाल्याने वाशिम जिल्ह्यातील चार आगारातील 12 लाखांचं नुकसान
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे दरवर्षी भैरवनाथ यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असलेले टाकळसिंगचे रहिवासी नागरिक यात्रेनिमित्त दरवर्षी गावी येतात. यात्रेनिमित्त मोठा उत्सव साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने येथील ग्रामस्थांनी यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
टाकळसिंग परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असल्याचे येथील सभापती माधुरी जगताप यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी होत असलेले सार्वजनिक व यात्रेचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.