बीड - एकीकडे महाराष्ट्रात दुसऱ्यांदा कोरोनाचे संकट हातपाय पसरवत आहे. तर, दुसरीकडे बीड जिल्हा रुग्णालय प्रशासनाची सोशल डिस्टन्सच्या संदर्भात गंभीर नसल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. लसीकरणासाठी आलेल्या फ्रंट लाईनच्या कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. लसीकरण दरम्यान शिस्त पाळून सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या आहेत. मात्र, लसीकरण दरम्यान सोशल डिस्टन्स पायदळी तुडवली असल्याचे चित्र बीडच्या जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळाले.
सध्या बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाचे केंद्र सुरू आहे. मागील नऊ- दहा महिन्यांमध्ये कोरोनाच्या बिकट परिस्थितीत फ्रंट लाईनवर काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस टोचवण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. महाराष्ट्रात पुन्हा बिकट परिस्थिती निर्माण होते की काय? अशी परिस्थिती असताना व औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीड जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या असतानादेखील जिल्हा रुग्णालय प्रशासन गंभीर नसल्याचे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होत आहे.