आष्टी (बीड) -जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मागील वर्षी मुदत संपली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे राज्यातील निवडणुका पुढे लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर 30 डिसेंबरला न्यायालयाने राज्यातील 39 सहकारी संस्थाचे निवडणूक कार्यक्रम चालू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, फक्त बीड जिल्हा बँकेचाच राजकीय दबावापोटी निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणास पाठवला नव्हता. याप्रकरणी 9 फेब्रुवारीला सुनावणी होऊन सर्व याचिका फेटाळून तात्काळ कार्यक्रम चालू करावा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यामुळे बीड मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार आहे.
याबाबत सदर याचिकेची सुनावणी 4 फेब्रुवारीला न्यायमुर्ती एस. पी. गंगापूरवाला आणि एस. ही. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान भाऊसाहेब नाठकर यांच्यातर्फे ॲड. सिध्देश्वर ठोंबरे आणि ॲड. सि. व्ही. ठोंबरे यांनी बाजू मांडली. तसेच निवडणुक कार्यक्रम चालु करावा आणि रिट फेटाळणीबाबत हस्तक्षेप अर्ज केला.