महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हारवाडीची छावणी अखेर रद्द, तपासणीत आढळली ७३७ जनावरांची तफावत - canceled Fodder camp

बीड जिल्ह्यात चारा छावणीच्या माध्यमातून पैसे खाण्याचा प्रकार सर्रास सुरु आहेत. विशेषतः बीड तालुक्यातील छावण्यांमधुन मोठ्याप्रमाणावर बोगस जनावरे दाखविण्यात आली आहेत.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने कोल्हारवाडीची छावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हारवाडीची छावणी अखेर रद्द, तपासणीत आढळली ७३७ जनावरांची तफावत

By

Published : May 10, 2019, 11:35 PM IST

बीड -छावणी तपासणीसाठी आलेल्या पथकाला शिवसेना जिल्हाप्रमुखाने अडवल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हारवाडी येथील छावणी प्रशासनाने रद्द केली आहे. गुरुवारी रात्री पोलीस बंदोबस्तात झालेल्या छावणीच्या तपासणीत तब्बल ७३७ जनावरांची तफावत आढळुन आली होती. प्रशासनाने कोल्हारवाडीची छावणी रद्द केली असली तरी याच संस्थेच्या इतर छावण्या मात्र आजही सुरू आहेत.

बीड जिल्ह्यात चारा छावणीच्या माध्यमातून पैसे खाण्याचा प्रकार सर्रास सुरु आहेत. विशेषतः बीड तालुक्यातील छावण्यांमधुन मोठ्याप्रमाणावर बोगस जनावरे दाखविण्यात आली आहेत. अशाच कोल्हारवाडी येथील छावणीच्या तपासणीसाठी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव गेल्या असता त्यांच्या तपासणीत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी अडथळे आणले होते. अगदी जनावरे मोजता येऊ नयेत म्हणून विज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. अखेर प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छावणीतील जनावरांची मोजणी करण्यात आली. यात १६०७ जनावरांची नोंद असताना प्रत्यक्षात ८७० जनावरेच आढळुन आली. याच छावणित महिन्या भरापुर्वी देखील एकाच रात्रीतुन तब्बल साडेसातशे जनावरे कमी झाल्याचा प्रकार समोर आला होता.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने कोल्हारवाडीची छावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आकडे फुगवल्याच्या प्रकरणात छावणीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा अथवा आतापर्यंतच्या फसवणुकिसाठी दंड आकरण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे या संदर्भाने प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांच्या नजरा आहेत. कोल्हारवाडीची छावणी चालवणाऱ्या संस्थेला बीड तालुक्यातच सुमारे १५ छावण्या मंजुर आहेत. या छावण्यांचे चित्र देखील कोल्हारवाडी पेक्षा वेगळे नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या छावण्यांची सुध्दा तपासणी होणार का हा प्रश्न कायम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details