बीड -कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्ह्यामध्ये जमाव बंदी करण्यात आली आहे. असे असतानाही माजलगाव तालक्यामध्ये लग्नासाठी जमाव जमला होता. त्यामुळे लग्न लावणाऱ्या आठ मुख्य लोकांविरोधात गुरुवारी सायंकाळी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भटजी, फोटोग्राफरसह, वर व वधूंच्या मामा आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -कमलनाथांची अग्निपरीक्षा उद्याच होणार, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश..
नवरीचे वडील विठ्ठल पांडुरंग कांबळे (रा. ब्रम्हगाव ता. माजलगाव), नवरदेवाची आई मनकर्णा सुभाष पाटोळे (रा, लवूळ ता. माजलगाव) , नवरदेवाचे चुलते, नवरदेवाचे मामा, नवरीचा मामा, भटजी आणि फोटोग्राफर यांच्यावरोधात कारवाई करण्यात आली आहे.
माजलगाव शहरापासून 1 किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास लग्नासाठी जमाव जमला असल्याची माहीती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला लग्नस्थळी जाण्याचे आदेश दिले. लग्नस्थळी 100 ते 125 लोक जमल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी संबंधीत मुख्य आठ लोकांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले. त्यानंतर इतर नातेवाईकांनी लग्न लावून दिले, ही कारवाई शरद पवार, किशोर राऊत, अजय सानप, एल.पी.सी. ज्योती कापले, विनायक अंकुशे या पोलिसांनी केली.