बीड House Set On Fire In Beed : घरावर पेट्रोल टाकून सहा जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील ढाकेफळ इथं मंगळवारी मध्यरात्री घडली. गोविंद दिलीप थोरात, वैजनाथ थोरात असं पेट्रोल घरावर टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या कुटुंब प्रमुखांची नावं आहेत. पेट्रोलमुळे आगीचा मोठा भडका उडाल्यानं हादरलेल्या कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानं शेजाऱ्यांनी त्यांची सुटका केली. या घटनेत थोरात कुटुंबातील सहा जणांना भाजल्यानं गंभीर जखमा झाल्या आहेत.
ढाकेफळ या गावात अज्ञात व्यक्तीनं मध्यरात्री घर पेटवून दिलं आहे. आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर पाहमी केली असता, घरामधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. पत्र्याचे शेड असल्यामुळे त्यानं लवकर पेट घेतला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. घरामधील नागरिकांना दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास आम्ही करत आहोत. - योगेश उबाळे, पोलीस निरीक्षक, युसुफ वडगाव पोलीस ठाणे
घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न :ढाकेफळ इथले गोविंद थोरात हे मंगळवारी आपल्या पत्नीसह घरात झोपले होते. तर त्यांच्या बाजुच्या खोलीत वैजनाथ थोरात हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह झोपले होते. मध्यरात्री अज्ञात आरोपीनं त्यांना जाळून मारण्याच्या हेतूनं घरावर पेट्रोल टाकून आग लावली. पेट्रोल टाकल्यानं आगीनं एकदम भडका घेतला. त्यामुळे झोपलेले दोन्ही कुटुंब हादरुन उठले. आगीचे रौद्र रुप पाहून लहान मुलांनी मोठा आरडाओरडा केला.