महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडकरांचा शहरांतर्गत प्रवास ठरतोय जीवघेणा; अवैध रिक्षा वाहतुकीकडे पोलिसांचा कानाडोळा - साठे चौकात

बीडमधील साठे चौकात भर रस्त्यावर अवैध वाहतूक करणारे रिक्षा उभा असतात. त्यामुळे बीडकरांना शहरातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. परिणामी सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. विशेष म्हणजे याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होतआहे.

अवैध वाहतूक

By

Published : Jun 16, 2019, 9:08 PM IST

बीड - शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. बीडकरांना शहरातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. भर रस्त्यावर अवैध वाहतूक करणाऱया रिक्षा उभ्या असतात. एवढेच नाही तर शहरातील साठे चौक येथून पोलिसांच्या समोरूनच अवैध वाहतूक करणारे रिक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करतात. या रिक्षांमुळेच साठे चौकात अनेक वेळा अपघात झालेले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याकडे पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. मात्र बीड शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.

अवैध रिक्षावाहनांची परस्थिती नागरिकांनी सांगितली

बीड शहराची लोकसंख्या साडेतीन ते चार लाखाच्या घरात आहे. बीड शहरातून दोनच मुख्य रस्ते गेले आहेत. यामध्ये धुळे- सोलापूर व बीड - नगर हे दोन मोठे मार्ग आहेत. बीड शहराला बायपास झाल्यापासून औरंगाबादहुन सोलापूरकडे जाणारी जड वाहने शहराच्या बाहेरून जातात. मात्र जालना रोडवर अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रिक्षा अगदी रस्त्यावर उभे करून प्रवासी रिक्षात भरले जातात. वाहतूक पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत एक चकार शब्ददेखील त्या रिक्षाचालकांना बोलत नाही, मग कारवाई तर दुरचीच गोष्ट झाली आहे. मात्र, पोलिसांची ही बाब बीडकरांच्या जीवास धोक्याची ठरत आहे.

शुक्रवारी दुपारी सायकलवरून घराकडे जात असलेल्या एका विद्यार्थाचा साठे चौकात अपघात होता- होता वाचला. सायकलवरुन घराकडे जात असलेल्या विद्यार्थ्याला अचानक रिक्षा आडवा आला. त्या विद्यार्थ्याने ब्रेक मारले. पाठीमागे असलेल्या कारचा धक्का त्याला लागला. सुदैवाने कारची गती अत्यंत कमी असल्याने मोठा अपघात टळला. हा सगळा प्रकार पोलिसांच्या डोळ्यासमोर रोज घडतो आहे. असे असतानाही बीड शहरातील साठे चौकातील अवैध वाहतूक करणारे रिक्षाचालकांचा पोलीस बंदोबस्त करत नाहीत. याचा 'अर्थ' काय? असा प्रश्न बीडकरांनी उपस्थित केला आहे.

बीड शहरातील बस स्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक व साठे चौक या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची देखील ये-जा वाढली आहे. असे असताना देखील बीड शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत करण्यात बीड पोलीस अपयशी ठरली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील व्यापारी नंदकिशोर कोठुळे म्हणाले की, बीड शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही आमच्यासाठी नित्याचीच झाली आहे. रिक्षा चालक अथवा इतर चार चाकी वाहने रस्त्यावरच उभी असतात. वाहतुकीला शिस्त नसल्याने आम्हाला जीव मुठीत धरूनच शहरातून प्रवास करावा लागतो.याशिवाय प्लंबिंग चा व्यवसाय करणारे महेश मातकर यांनी सांगितले की, दुचाकी अथवा चारचाकी वाहन पार्किंग करण्याची व्यवस्था बीड शहरात नाही. परिणामी लोक दिसेल त्या जागेवर वाहने उभी करतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. अपघाताचे प्रमाण वाढते. यामुळे वाहतूक पोलीस व बीड नगरपालिका या दोघांनीही वाहने पार्किंग करायला जागा देणे आवश्यक आहे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details