महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आढावा विधानसभेचा : अस्तित्वासाठी क्षीरसागर काका-पुतणे सज्ज, मेटे मांडणार वेगळी चूल? - पंकजा मुंडे

आखाडा विधानसभेमध्ये जाणून घेऊया बीड विधानसभा मतदारसंघातील चित्र. भाजप-सेना-शिवसंग्राम-वंचित यांमध्ये लढत होणार आहे. जयदत्त क्षिरसागर आणि विनायक मेटेंमध्ये सेना-भाजपची तिकीट घेण्यावरुन स्पर्धा सुरु आहे.

बीड विधानसभा मतदारसंघ

By

Published : Aug 27, 2019, 8:47 PM IST

Updated : Aug 28, 2019, 4:07 AM IST

बीड - विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. गेल्या पाच वर्षात प्रचंड राजकीय स्थित्यंतरे घडल्याने बीड विधानसभा मतदारसंघात राजकारणाने कूस बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत स्थिरावलेले फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे शड्डू ठोकून तयार आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुतणे संदीप क्षीरसागर यांनी जनसंपर्क अभियान सुरू केले आहे.

आढावा विधानसभेचा

शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे व वर्षभरापूर्वी शिवसंग्रामला रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेले राजेंद्र मस्के या दोघांनीही भाजपकडून बीड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर दावा केला आहे. असे असले तरी राज्याच्या राजकारणात युती व आघाडी झाली नाही तर बीड विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण? याबाबत अद्याप तरी संभ्रम आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीही सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत असून अ‌ॅड. शेख शफीक यांच्या नावाची चर्चा बीडमध्ये होत आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयदत्त क्षीरसागर तर भाजपकडून आमदार विनायक मेटे यांच्यात थेट लढत झाली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड शहरात विनायक मेटे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली होती. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांनी मोदी लाटेचा सामना करत आमदार विनायक मेटे यांना पाच हजारपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले होते. दरम्यान, शिवसेनेचे बीड मतदारसंघातील उमेदवार अनिल जगताप यांना सोळा हजाराच्या आसपास मते पडली होती. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर व भाजपचे विनायक मेटे या दोघांमध्येच 2014 मध्ये थेट लढत झाली होती.

बीडच्या राजकारणाने बदलली कूस -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून जयदत्त क्षीरसागर यांची ओळख होती. पक्षातील काही नेत्यांकडून त्यांना त्रास देण्याचे काम झाले. एवढेच नाही तर जयदत्त क्षीरसागर यांचे व पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यात उभी फूट पाडण्यामध्ये बारामतीचा हात असल्याचे कारण पुढे करत क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम ठोकला. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हाताने शिवबंधन बांधून घेतले. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन ओबीसी समाजाला न्याय दिला आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या नेत्यांमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचा नंबर आहे.

जिल्ह्यात संस्थांचे जाळे क्षीरसागर यांनी उभे केलेले आहे. त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघावर जयदत्त क्षीरसागर यांची पकड आहे. मात्र, आता जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात पुतणे संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत. यामुळे जयदत्त क्षीरसागर यांची मते विभागली जातील, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. असे असले तरी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भूमिका बीड विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी पंकजा मुंडे यांची बहीण डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती. विशेष म्हणजे तेव्हा जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत देखील प्रवेश केला नव्हता. तरी देखील पंकजा मुंडे यांना जयदत्त क्षीरसागर यांनी सहकार्य केले. या सहकार्यातून उतराई होण्यासाठी पंकजा मुंडे यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये क्षीरसागर यांना जमेल तशी मदत करणे अपेक्षित आहे. जर शिवसेना व भाजप यांच्यात युती झाली तर बीडची जागा शिवसेनेकडे आहे. अशावेळी भाजपचा स्वतंत्र उमेदवार बीड विधानसभा मतदारसंघात उभा असेल, अशी परिस्थिती ओढवली तरीदेखील पंकजा मुंडे यांची भूमिका विनायक मेटे यांच्या विरोधातच असेल, यात शंका नाही. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्रामने भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात जाहीर प्रचार केला होता.

अशी आहे सद्यस्थिती -
मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पश्चिमी नद्या मराठवाड्यात वळवण्याच्या मुद्द्याला फोकस केले आहे. तर दुसरीकडे शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी स्थानिक मुद्दांना फोकस करत घराणेशाही विरोधात दंड थोपटले आहेत. या सगळ्या प्रक्रियेत जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेत आहेत. मागील एक महिन्यापासून संदीप क्षीरसागर यांनी प्रचार सुरु केला आहे. नुकतेच भाजप मध्ये आलेले राजेंद्र मस्के यांनी देखील ग्रामीण भागात आपली पकड मजबूत केली असल्याचे चित्र आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणाला उमेदवारी मिळते व कोण बाजी मारते याला हे पाहण्यासाठी काही वेळ लागणार आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांचे फोडाफोडीचे राजकारण -
जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. तसतसे फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना आश्वासने देऊन आपल्या पक्षात ओढण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 35 हजार एवढे मतदान आहे. 2014 च्या बीड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकांमध्ये निवडणुकीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी भाजप पुरस्कृत असलेले शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा पाच हजार मतांनी पराभव केला होता. 2019 च्या बीड विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार विनायक मेटे यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा करत आहेत. मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे यांची आमदार मेटे यांच्या उमेदवारीवरून काय भूमिका ठरते यावरच मेटे यांच्या भाजपच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून आहे.

Last Updated : Aug 28, 2019, 4:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details