बीड :अंबाजोगाईमध्ये वही खरेदी करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर किराणा दुकानदाराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात तिसरे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या.एम.बी.पटवारी यांनी आरोपीला दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.१८) ठोठावली. शहरात चार वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. शेख सिराज शेख मुन्सी (२५,रा.मियाभाई कॉलनी, अंबाजोगाई) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ वर्षीय पीडित मुलगी २३ मे २०१७ रोजी शेख सिराज शेख मुन्सी याच्या किराणा दुकानात वही आणण्यासाठी गेली होती. यावेळी शेख सिराजने तिला जवळ बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तेथे इतर ग्राहक आल्याने पीडितेची त्याच्या तावडीतून सुटका झाली. तिने रडत-रडत घर गाठले व सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी त्यास जाब विचारला तेव्हा त्याने जातिवाचक शिवीगाळ करुन उलट त्यांनाच धमकावले. या प्रकरणी शहर पोलिसांत शेख सिराज शेख मुन्सीवर बलात्काराचा प्रयत्न, विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध, ॲट्रॉसिटी या कमलान्वये गुन्हा नोंद झाला होता.