बीड : आज गुरुपौर्णिमेदिवशीच सोमवारी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास नगर रोडवर दुचाकी व चार चाकीचा अपघात झाला. या अपघातात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्यामुळे सदरील शिक्षकांचे मृतदेह जळाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत, रोज नवीन बातम्या ऐकायला मिळतात. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ऐन गुरूपौर्णिमेच्या दिवशीच शिक्षकांचा बळी गेला आहे.
दुचाकीला चारचाकीची धडक : सदरील मयत शिक्षकांची नावे अंकुश साहेबराव गव्हाणे आणि शहादेव शिवाजी डोंगर आहे. ते शिरूर तालुक्यातील जेधेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. सोमवारी सकाळी बीड येथून दुचाकीवरून जेधेवाडी येथे जात असताना नगर रोडवरील बीपीएड कॉलेज जवळील पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला कार क्र. (एम एच 14/ जेई 5372) ने जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने दोघांचे मृतदेह जळल्याचे वृत्त आहे.