बीड - सरकारने आशा सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मानधनात योग्य वाढ करावी, या मागणीसाठी बुधवारी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बार्शी नाका येथून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी महिलांच्या घोषणाबाजीने शहर दणाणून गेले होते.
आशा सेविकांचा वेतनवाढीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार! हेही वाचा - मानधनवाढीसाठी अहमदनगर आशा सेविकांचा जिल्हापरिषदेवर एल्गार
ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत मोठी भूमिका बजावणाऱ्या आशासेविकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची भावना राज्यभरात दिसून येत आहे. मानधन वाढीचा प्रश्न गेले अनेक महिने रेंगाळत आहे. अल्प मानधनावर आशा सेविका व गटप्रवर्तकांना काम करावे लागत हे आंदोलक रस्त्यावर उतरले.
हेही वाचा - भाजप आमदार संगीता ठोंबरेंसह पती विजयप्रकाश यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश
बीड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजप व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय दर्जा देऊन मानधन वाढ करण्याबाबत ठरले होते. या मागणीची घोषणा करण्याचा शब्ददेखील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी दिला होता. मात्र, जाणीवपूर्वक आशा सेविकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी आशा स्वयंसेवक संघटनेचे प्रमुख भगवान देशमुख यांनी केला आहे. मागील पाच वर्षांच्या काळात अनेक वेळा आशा स्वयंसेविका यांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून आम्ही लावून धरले आहेत. मात्र, सरकार आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी संघटनेच्या आशा स्वयंसेवक संघटनेच्या कमल बांगर, दत्ता देशमुख, सचिन आंधळे यांच्यासह जिल्हाभरातील आशा स्वयंसेवक महिलांची उपस्थिती होती.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचे जेलभरो आंदोलन