बीड : बँकातील गर्दी टाळा, शेतकऱ्यांना गावात जाऊन पीक कर्जाचे वाटप करा -जिल्हाधिकारी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांनी शाखांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. त्यासाठी पीक कर्ज वाटप करताना बँकांनी किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारेच पीक कर्ज संबंधित शेतकऱ्याच्या गावात जाऊन वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना दिले आहेत.
बीड -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांनी शाखांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी खरीप हंगाम सन 2020-21 करीता पीक कर्ज वाटप करताना बँकांनी किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारेच पीक कर्ज संबंधित शेतकऱ्याच्या गावात जाऊन वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
याबाबत खरीप पीक कर्जवाटप लक्षांक पूर्ततेसंदर्भात बँकांनी करावयाच्या उपाययोजना बाबत जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी बँकांना सूचना दिल्या आहेत. पीक कर्जाचे वाटप संबंधित गावात जाऊन करावे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवाटपाबाबत संबंधित सेवा सहकारी संस्थेच्या गट सचिवांनी दररोज पीक कर्ज मागणी अर्ज शेतकऱ्यांकडून गोळा करून बँक शाखेत दाखल करावेत. बँकेने दिलेले शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवशी गावात जाऊन जागेवर वाटप करावे, आदि सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
सर्व बँकांनी पीक कर्ज वाटपाचे गाव निहाय वेळापत्रक तयार करून या कार्यालयास सादर करावे. सदर वेळापत्रकास जाहीर प्रसिद्धी द्यावी. मेळाव्याचा कार्यक्रम 18 मे 2020 पासून सुरू करावा. संबंधित गावात सदर वेळापत्रकास पुरेशी प्रसिद्धी द्यावी. सदर पीक कर्ज मेळाव्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर या गोष्टींचे कागदपत्रे हाताळताना बारकाईने पालन करावे. असेही जिल्हाधिकारी यांनी निर्देशामध्ये म्हटले आहे.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गटसचिवांनी त्यांच्या कर्जदारांच्या याद्या गावनिहाय दररोज संबंधित जि. म.स बँक शाखेला द्याव्यात. तसेच, शेतकऱ्यांना मागणीनुसार वेळेवर ना हरकत दाखला देण्यात यावा. तसेच, जुन्या पीक कर्ज थकबाकीदारांच्या याद्या सर्व संबंधित बँकांना तत्काळ उपलब्ध करून द्याव्या. सर्व सचिवांच्या सह्यांचे नमुने सर्व संबंधित बँकांना तात्काळ उपलब्ध करून द्यावे.
पीक कर्ज मागणी अर्ज भरून घेताना 10 पानाच्या चेक बुकची मागणी घ्यावी. प्रत्येक शेतकऱ्यास या चेक बुकसह पोस्टाने घरपोच किसान क्रेडिट कार्ड (ATM) कार्ड द्यावे. कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांना यावे लागू नये. याची खात्री करावी.
सर्व बँकांनी पीक कर्ज वाटप फक्त किसान क्रेडिट कार्ड द्वारेच करावे असा शासनाचा आदेश आहे. किसान क्रेडिट कार्ड शिवाय कर्ज वाटप केल्यास बँकांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या व्याज सवलतीचा फायदा मिळणार नाही. पीक कर्जाची रक्कम बँकेच्या शाखेतून काढता येणार नाही. ती ग्राहक सेवा केंद्र, ATM द्वारेच काढावी लागेल अशा प्रकारच्या सूचनांचे बॅनर प्रत्येक शाखेत लावावेत. तसेच वरील सूचनांचा शिक्का कर्ज मागणी अर्जावर मारावा. कोणीही शेतकरी रक्कम काढण्यासाठी बँक शाखेत येणार नाही. याची काळजी घ्यावी. जर शेतकरी बँकेत आल्यास त्यांना कॅशमध्ये रक्कम देऊ नये. असे आपल्या निर्देशामध्ये जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.