महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 7, 2020, 5:16 AM IST

Updated : Jun 7, 2020, 6:14 AM IST

ETV Bharat / state

फेरफारची सक्ती प्रकरण; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बँकाकडून फासला जातो 'हरताळ'

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर करताना फेरफार सक्ती करू नये, असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला बँकांकडून हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे.

Beed
शेतकऱ्यांच्या रांगा

बीड- सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर करताना फेरफार सक्ती करू नये, असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला बँकांकडून हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर याची दखल घेऊन योग्य तो उपाय आम्हाला करावा लागेल, अशी प्रतिक्रिया बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

फेरफारची सक्ती; फेरफार प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला बँकाकडून हरताळ

शेतकरी बँकेत कर्ज प्रकरण मंजुरीसाठी कागदपत्र घेऊन गेल्यानंतर फेरफार असेल तरच कर्ज प्रकरण मंजूर करू, असे जुन्या खातेदारांना देखील बँका सांगत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याचाच परिणाम बीड तहसील कार्यालयात कोरोनाच्या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांच्या फेरफारसाठीच्या रांगा लागत आहेत.

शेतकऱ्यांच्या पीक कर्ज मंजुरी प्रकरणी यापूर्वीचा बँकांचा अनुभव अत्यंत वाईट आहे. मात्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दोन दिवसापूर्वी पीक कर्जासाठी फेरफारची अट शिथिल केल्यानंतर बळीराजाला थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र नेहमीप्रमाणेच बँका जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

सध्या संबंध देशावर कोरोना विषाणूचे संकट आहे. अशा परिस्थितीत बीडच्या तहसील कार्यालयात शेतकरी फेरफारसाठी रांगेत उभे राहत आहेत. याशिवाय तहसीलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील वाढत्या गर्दीमुळे ताण येत आहे. याकडे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Last Updated : Jun 7, 2020, 6:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details