बीड- वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासून ऊस तोडणीचे काम करणाऱ्या बीड जिल्ह्यातील 7 लाख ऊसतोड मजुरांची अवस्था वाईट आहे. वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी हातात कोयता घेऊन उसाच्या फडात आयुष्याशी झगडणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या जीवावर जिल्ह्यात अनेक नेते मोठे झाले आहेत. मात्र, उसाच्या फडात आयुष्याचे पाचरट झालेल्या ऊसतोड कामगारांचे प्रश्न गेल्या 25 वर्षात सुटले नाहीत.
ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात बीड जिल्ह्यातून 7 लाखाहून अधिक ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी राज्याबाहेर निघाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या उचलीतच यंदा देखील उस तोडवा लागणार असल्याचे दुःख उरावर घेऊन कामगारांनी कोयता उचलला आहे. या सगळ्या परिस्थितीत कुटुंब जगवायचं कसं? हा प्रश्न ऊसतोड मजुरांनी उपस्थित केला आहे. शासन धोरणामुळे मुकादम देखील उध्वस्त होत आहेत.
हेही वाचा -पंकजा मुंडे आता विधान परिषदेवर जाणार का? चर्चांना उधान
गेल्यावर्षी मुकादमाकडून घेतलेली 80 हजाराची रक्कम फिटली नव्हती. यंदातर अजून वाईट परिस्थिती आहे. कारखाने उसाअभावी चालतील की नाही? अशी स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या 80 हजारातून 45 हजार रुपये उचल आमच्याकडे बाकी आहेत. आता यंदा पुन्हा गेल्याच वर्षीच्याच उचलीत ऊस तोडायला निघालोय, अशी कैफियत मांडताना ऊसतोड कामगारांच्या डोळ्यात पाणी आले.
ही व्यथा मांडली आहे धारूर तालुक्यातील ऊसतोड कामगार कलाबाई धोत्रे, दैवाण आंधळे, काळूराम धोत्रे या ऊसतोड मजुरांनी. बीड जिल्ह्यातून 7 लाखहुन अधिक ऊसतोड मजूर उसतोडणीसाठी पर राज्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार व मुकादम वाहतूक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रदीप भागे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ऊस उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. याचा परिणाम बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांवर होताना दिसत असल्याचे ऊसतोड मजुरांचे मुकादम हनुमंत नागरगोजे यांनी सांगितले.