बीड- पश्चिम महाराष्ट्रातून हजारो ऊसतोड मजूर बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मात्र, जोपर्यंत क्वारंनटाईनचा अवधी संपत नाही तोपर्यंत त्यांना गावात जाण्यासाठी परवानगी नाही. तसेच खबरदारी म्हणून पर जिल्ह्यातून व राज्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांना गावाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांची हेळसांड होते आहे. तर मजूरांजवळ धान्य असताना गावातल्या पिठाच्या गिरणीवर धान्य दळून आणायला जाता येत नाही. त्यामुळे मजूरांची फरफट होत असल्याचा आरोप मजूरांनी केला आहे.
बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. दरवर्षी लाखो ऊसतोड मजूर ऊस तोडण्यासाठी परराज्यात व जिल्ह्यात जातात. यावर्षी अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. परिणामी बाहेरगावी असलेले ऊसतोड मजूर अडकून पडले होते. मात्र, शासनाने त्या ऊसतोड मजुरांना गावी आणण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर मजूर गावी परतले मात्र तरीही मजुरांची फरपट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.