महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अखेर ॲसिड हल्ल्यातील 'त्या' तरुणीचा मृत्यू; आरोपी अद्यापही फरार - बीड गुन्हे वार्ता

22 वर्षीय प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार बीड येथे घडला होता. त्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.

attempt to burn girlfriend by acid attack in beed
प्रेयसीवर ॲसिड हल्ला करून जाळण्याचा प्रयत्न; बीड येथील प्रकार

By

Published : Nov 15, 2020, 1:18 PM IST

Updated : Nov 15, 2020, 3:33 PM IST

बीड -नेकनूरजवळ असलेल्या येळंब घाट परिसरात 22 वर्षीय प्रेयसीला अ‌ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची दुर्दैवी घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडली होती. जखमी अवस्थेत त्या मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर रविवारी दुपारी दोन वाजता तिचा उपचारादरम्यान बीडच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे. हा अमानुष प्रकार केल्यानंतर प्रियकर फरार झाला. धक्कादायक म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात तडफडत होती.

दोघेही राहत होते रिलेशनशिपमध्ये-

नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील ही 22 वर्षीयतरुणी शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहून गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. यादरम्यानच अविनाशने हे कृत्य केले. त्याने प्रथम तिच्यावर ॲसिडटाकले. केवळ ॲसिड टाकूनच हा प्रकार थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर अविनाश फरार झाला. मृत्यूपूर्वी नेकनूर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला असून फरार आरोपी अविनाशचा तपास पोलीस करत आहेत.

12 तास पडून होती खड्ड्यात-

दुर्दैवाची बाब म्हणजे, पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्ड्यात 12 तास पडून होती. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला आणि जखमी तरुणीला स्वत:च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून रुग्णवाहिकेने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ऐन दिवाळीत ही दुर्देवी घटना उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

हिंगणघाटमध्येही घडला होता असाच प्रकार-

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटमधील नांदोरी चौकात ३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका तरुणीला आरोपी विकी नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे हिंगणघाट हादरून गेले होते. सात दिवस पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच पीडितेची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान तिच्यावर चार वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पीडितेचा रक्तदाब नियंत्रणात नसल्याने तिला श्वसनाला त्रास होत होता. त्यानंतर तिला व्हेंटीलेटरवर ठेवले होते. परंतु 10 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा- 'लागीर झालं जी' मालिकेतील 'जिजी' कमल ठोके यांचे निधन, कराडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Last Updated : Nov 15, 2020, 3:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details