बीड : पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, परमेश्वर वैजनाथ लेवडे (वय 25 वर्षे) या युवकाचे शहरामध्ये फुटवेअरचे दुकान आहे. मागील एक वर्षापूर्वी वैजनाथ लेवडे यांनी रमेश बालासाहेब वारे (रा. कोथरूळ) यांच्याकडून 20 लाख रुपये गणेश भिसे याच्या एका कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिले होते. या रक्कमेचा परतावा 2 लाख 10 हजार रुपये देण्यात आला. त्यानंतर बाकी रक्कम व त्याचा वाढीव परतावा दिला गेला नाही. त्याच्या बदल्यात गणेश भिसे याने त्याच्या एचडीएफसी बॅंकेचा चेक वडिलांना दिला होता. मात्र, भिसे याच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने तो चेक बाऊन्स झाला. म्हणून त्या चेकच्या आधारे मागील चार महिन्यांपूर्वी येथील कोर्टात गणेश भिसे, रमेश वारे, पूजा भिसे व प्रीती भिसे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला गेला होता.
बायपास रोडवर बोलवून केले अपहरण :14 जुलै रोजी गणेश राजाराम भिसे याने परमेश्वर लेवडे याला फोन करून पैशाबद्दल बोलण्यासाठी बायपास रोडला बोलावले. यानंतर परमेश्वर आणि त्याचा मित्र सुनिल बब्रुवान (रा. बेलुरा) हे गणेशला भेटायला गेले होते. यानंतर गणेशने त्यांच्याकडे असलेल्या विनानंबरच्या सफारी गाडीमध्ये दोघांनाही बसवून त्यांचे अपहरण केले आणि जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. घटनेनंतर सुनिलने पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावर पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी सतर्कता दाखवत गेवराई पोलिसांना व ट्रॅफिक पोलिसांनी गाडीचे वर्णन सांगितले व गढीजवळ असलेल्या टोलनाक्यावर पोलिसांनी गाडी थांबवत अपहरण झालेल्या परमेश्वर व सुनिल या दोघांचीही सुटका केली.