परळी वैजनाथ (बीड) - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये संवाद साधणारे अरुण राठोड यांच्या घरी सोमवारी पहाटे चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी झाली की, जाणीवपूर्वक कोणी हा प्रकार केला. याचा तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.
गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू-
परळी येथील पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. रविवारी या प्रकरणातील संशयित अरुण राठोड व त्याचे कुटुंबीय घराला कुलूप लावून गायब झाले होते. सोमवारी सकाळी परत अरुण राठोड यांचे कुटुंबीय घरी आल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे अरुण राठोड यांच्या घरी चोरी झाली आहे. या चोरीत नेमके काय चोरून नेले याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.