बीड - मागील चार वर्षापासून बीडमध्ये ऐतिहासिक शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यंदाही शिवजयंतीनिमित्त ४ राज्यातील कलाकार बीडमध्ये आपली कला सादर करणार असल्याची माहिती बीडचे आमदार आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
बीड शहरातून निघणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला व लहान मुलांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या मिरवणुकीत १ हजारच्या जवळपास कलाकार आपली कला सादर करणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणाकडून १ रुपयाही पट्टी न घेता शिवजयंती संयोजन समितीच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो.
बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील ४ वर्षापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केरळ, पंजाब, हरियाणा, आंध्रप्रदेश येथील वेगवेगळ्या प्रकारचे इतिहास कालीन कला सादर करणारे कलाकार येतात. यामध्ये परराज्यातील कलाकार दांडपट्टा, तलवारबाजी यासह इतर कसरती सादर करतात. बीडकरांसाठी हे मुख्य आकर्षण राहिलेले आहे. या अनोख्या शिव-जयंती महोत्सवाचा लाभ जनतेने घ्यावा, असे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत आमदार क्षीरसागर यांनी केले.