बीड - जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्याबाबत सूचना केल्या होत्या. बुधवारी व्यापाऱ्यांनी अँटीजन टेस्टसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले. पहिल्याच दिवशी 495 व्यापाऱ्यांची अंतिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी केवळ 9 व्यापारी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह निघालेल्या व्यापाऱ्यांना होम आयसोलेशनची परवानगी द्या, अशी मागणीदेखील यावेळी व्यापाऱ्यांनी केली आहे.
व्यापाऱ्यांमध्ये पॉझिटीव्ह असण्याचे प्रमाण अत्यल्प -
बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 9 हजार 900 वर पोहोचली असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या कोविड हॉस्पिटलमध्ये 1000 कोरोनाचे सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी बीड शहरातील व्यापार्यांची अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना बीड जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. पहिल्याच दिवशी शहरातील एकूण 4 केंद्रावरून 495 व्यापाऱ्यांची अंतिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी केवळ नऊच व्यापारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. एकंदरीत व्यापाऱ्यांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, याचा अधिक फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता म्हणून सर्वप्रथम व्यापाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले असल्याचे बीड शहरात बुधवारी पाहायला मिळाले.