बीड : परळीच्या पांगरी येथील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला ( Pankaja Munde group Defeat ) आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले ( Dhananjay Munde Group Victory ) आहेत. तब्बल 10 वर्षानंतर पांगरी येथील सोसायटीवर धनंजय मुंडे यांचे एकहाती वर्चस्व पहावयास मिळाले आहे. पांगरी येथेच गोपीनाथ गड आहे. त्यामुळे मुंडे भावंडांची ही लढाई वर्चस्वाची ठरते. आणि याच गावातून धनंजय मुंडे यांच्या गटाने दणदणीत विजय मिळविल्याने पंकजा मुंडे यांच्या अस्तित्वावर गदा आला आहे. पांगरी सोसायटी धनंजय मुंडेंच्या ताब्यात गेल्याने पंकजा मुंडे यांना मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान निवडणूक विजयानंतर धनंजय मुंडेंच्या गटाने मोठा जल्लोष केला आहे.
पांगरी सोसायटीवर वर्चस्व :लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पांगरी सोसायटीवर वर्चस्व होते. मात्र त्यांच्या निधनानंतर पांगरीच्या ग्रामस्थांनी पंकजा मुंडे यांना मोठी साथ देत सेवा सहकारी सोसायटी ताब्यात दिली. यंदा मात्र या निवडणुकीत मुंडे बहीण भावात चुरशीची लढाई पहावयास मिळाली. विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने धनंजय मुंडे विजयी झाले. त्यानंतर मात्र परळी मतदार संघातील अनेक लहान मोठ्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे जातीने लक्ष देत विजयाची मुहूर्तमेढ रोवण्यास सुरूवात केली. आणि त्याचेच फलित म्हणून पांगरी सेवा सहकारी सोसायटीकडे पाहिले जातेय. 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच या सोसायटीवर राष्ट्रवादी म्हणजेच धनंजय मुंडे यांनी एकहाती वर्चस्व मिळविले आहे.