बीड - काही अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम करतात. अशाच एका पोलीस अधिकाऱ्याच्या प्रामाणिक धडपडीची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. गेवराई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी दोन किलोमीटर चिखल तुडवत जाऊन घटनेचा पंचनामा केला. याबाबत देशमुख यांना समजताच त्यांनी ट्विटवरून काळे यांचे कोतुक केले.
बीड जिल्ह्यातील एरंडगाव (ता. गेवराई) येथील सखाराम कवठेकर या ऊसतोड मजूराने २५ सप्टेंबरला आत्महत्या केली. हे प्रकरण गेवराई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्याकडे आले. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह मुकादमांचा आरोपींमध्ये समावेश होता. घटनास्थळाच्या पंचनाम्यासाठी काळे यांनी एरंडगाव गाठले. आत्महत्या करणारे सखाराम कवठेकर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतात राहत होते. शेतात जाण्यासाठी रस्ता तर नाहीच, शिवाय सततच्या जोरदार पावसाने सर्वत्र चिखलही झाला आहे. त्यामुळे काळे यांनी गावातच पंचनामा करावा, आम्ही स्वाक्षऱ्या करू, असा प्रस्ताव गावकऱ्यांनी ठेवला. मात्र, संदीप काळे यांनी याला नकार देत घटनास्थळी जाण्याचा आग्रह केला.
संदीप यांनी अनवाणी पायाने चिखलमय रस्ता, शेतात वाढलेले तूर आणि कपाशीच्या पिकांतून रस्ता काढत घटनास्थळ गाठले आणि पंचनामा केला. गावातच पंचनामा केला असता तर, त्यात त्रुटी राहून आरोपींना भविष्यात पळवाट शोधण्यास संधी मिळाली असती. असे होऊ नये म्हणून काळे यांनी चिखलातून पायपीटीचा मार्ग अवलंबिला. त्यांच्या या प्रामाणिकपणाची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. स्वत:च्या सोशल मीडिया पेजवरून देशमुख यांनी संदीप काळे चिखलातून पायपीट करत असल्याचे फोटो पोस्ट करून कौतुक केले.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे
आमदार मनिषा कायंदे यांनीही आपल्या ट्विटरवर ‘सत्कार्यासाठी काम करावे, सत्कारासाठी नाही. या हेतूने महाराष्ट्र पोलीस जनतेसाठी सदैव तत्पर! गेवराई तालुक्यात पंचनामा करण्यासाठी चिखलात दोन किलोमीटर चालत जाणारे सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्दीला सलाम’ अशी पोस्टकरून शाबासकी दिली आहे.
शिक्षकी पेशातून पोलीस दलात आलेल्या संदीप काळे यांची पंधरा वर्षांची कारकीर्द राहिली आहे. अत्यंत शांत, संयमी तसेच लोकाभिमुख अधिकारी म्हणून काळेंची ओळख आहे. त्यांच्या कार्यतत्परतेचे गृहमंत्र्यांसह आमदारांनी कौतुक केले. त्यामुळे बीड पोलीस दलाची मान उंचावली आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत, चिखल, नदी आणि दऱ्याखोऱ्या काय, आम्हाला वर्दीचे कर्तव्य बजावण्यासाठी सर्व सारखे असल्याची भावना संदीप काळे यांनी व्यक्त केली. 'बीड पोलीस दलामध्ये कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यतत्पर अधिकारी असल्याचा अभिमान असल्याचे' पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी म्हणाले.