महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागरीकांच्या आरोग्यासाठी तिरडीपेक्षा परडी बरी - अमित घाडगे - बीड कोरोना न्यूज

परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित घाडगे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आरोग्य यंत्रणांना काही सूचना केल्या आहेत. तसेच मोफत सीटी स्कॅन तपासणी उपजिल्हा रुग्णालयात व्हावी, नागरिकांच्या आरोग्यासाठी दारोदारी परडी मागून निधी उभारू, असे म्हटले आहे.

Beed
Beed

By

Published : Apr 24, 2021, 2:23 PM IST

परळी वैजनाथ (बीड) : ‘तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. सरकारी सेवेतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा जीवापाड प्रयत्न करत आहेत. पण, त्यांना सरकार कुठलेच पाठबळ देताना दिसत नाहीत’, असे परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित घाडगे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

‘"धनंजय मुंडेंनी यंत्रणा कामाला लावली अन 48 तासात परळीत उभारले 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर; शुक्रवारपासून परळीच्या ग्रामीण रुग्णालयात होणार सुरू", ही बातमी वाचली. पण प्रत्यक्षात आज (24 एप्रिल) सकाळी 10 वाजेपर्यंतही रुग्णालय सुरू झाले नाही’, असे घाडगे यांनी म्हटले.

'कोविड केअर सेंटर सुरू करण्यापूर्वी भंडारा, भांडूप, विरार येथील आगीच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अग्निशामक तपासणी (Fire Audit) करून सक्षम फायर सेफ्टी यंत्रणा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून द्यावी. तसेच नाशिकमधील प्राणवायू संकटाचीही घटना आपल्या इथे घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. गेल्या दोन महिन्यात सत्ताधाऱ्यांनी केलेले जवळपास प्रत्येक दावे खोटे सिद्ध होत आहेत. ही प्रसिद्धीची वेळ नाही तर कामाची आहे', असेही घाडगे म्हणाले.

मोफत सीटी स्कॅन तपासणी उपजिल्हा रुग्णालयात व्हावी-

‘सध्या परळी वैजनाथ शहरात एकच खासगी 4 स्लाईसची सीटी स्कॅन मशीन आहे. त्यामुळे त्यावर ताण येत आहे. सोबतच रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात 5 सीटी स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्यातील 3 कोविड तर 2 नॉन कोविड रुग्णांसाठी वापरात आल्या तर तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. प्रत्येक गोष्टीसाठी परळीकरांनी कधीपर्यंत अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयावर अवलंबून रहायचे?’ असा प्रश्न घाडगे यांनी केला.

‘जर बजेट ही अडचण असेल तर आम्ही नागरिकांच्या आरोग्यासाठी दारोदार परडी घेऊन जाऊ व जितका निधी उभारला जाईल तो आपल्या सरकारकडे जमा करू. सरकारला आमचे सांगणे आहे की नागरिकांच्या आरोग्यासाठी तिरडीपेक्षा परडी कधीही परवडेल’, असे त्यांनी म्हटले.

आरोग्य विभागाने दररोज मेडिकल बुलेटिन काढावे-

‘परळी वैजनाथ तालुक्यातील आरोग्य विभागास आवाहन आहे, की दररोज किती लस आली? किती दिली? कोरोना रुग्णांना आवश्यक औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर किती उपलब्ध आहे? आदी सर्व बाबींची माहिती मेडिकल बुलेटिन काढून दिली जावी’, असेही त्यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details