बीड - जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात तागडगाव येथे सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे हे दांपत्य वन्यजीवांच्या संवर्धनासाठी गेल्या सतरा वर्षांपासून सर्पराज्ञी प्रकल्पाच्या माध्यमातून काम करत आहेत. हा निसर्ग व येथील सृष्टीवर जेवढा मानवाचा अधिकार आहे, तेवढाच अधिकार वन्यजीव प्राण्यांचादेखील आहे. ही भावना सोनवणे दाम्पत्यांनी जोपासून मागील 17 वर्षात दोन हजाराहून अधिक वन्यजीवांना जीवनदान दिले आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा.
बीड शहरापासून साधारण 35 ते 40 किलोमीटरवर शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव येथे निसर्गरम्य वातावरणात हा सर्पराज्ञी प्रकल्प उभा आहे. जिथे माणूस माणसाला विचारत नाही तिथे सिद्धार्थ सोनवणे व त्यांच्या पत्नी सृष्टी सोनवणे हे दाम्पत्य अनेक वन्यजीव प्राण्यांचा सांभाळ करताहेत. एखादा पक्षी अथवा कुठलाही वन्यजीव प्राणी जखमी होतो किंवा आजारी पडतो तेव्हा त्या पक्षाला अथवा कुठल्याही वन्य जीवाला सर्पराज्ञी प्रकल्पामध्ये आणून सोडले जाते. या प्रकल्पात सिद्धार्थ सोनवणे व त्यांच्या पत्नी डॉक्टरांच्या मदतीने त्या प्राण्यांवर उपचार करतात. तो पक्षी आजारातून बरा झाल्यानंतर पुन्हा त्यांना निसर्गाच्या अधिवासात सोडून दिले जाते. हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे यांनी सुरू ठेवला आहे.
तेरा एकर जमीन वन्यजीवांसाठी -
सिद्धार्थ सोनवणे यांची एकूण 17 एकर जमीन गावच्या शिवारात आहे. त्यातील केवळ 4 एकर जमीन ते कुटुंबासाठी कसतात बाकी 13 एकर जमीन केवळ वन्यजीवांसाठी सोनवणे दाम्पत्य वापरतात. वन्यजीवांच्या संवर्धनासाठीची ही भावना लहानपणापासूनच सिद्धार्थ यांच्या मनामध्ये होती. याबाबत सांगताना सिद्धार्थ म्हणाले की, माझ्या बालपणीचे मित्र भिल्ल समाजातले. त्यांच्यासोबत मासे, खेकडे पकडायला जायचो. अशातच एकदा पाण्यातला इरूळा पकडला आणि मग आपण साप पकडू शकतो, हे लक्षात आले. हळूहळू वृत्तपत्रांमधून सापाची माहिती मिळवत गेलो आणि सगळ्या प्रकारचे साप पकडायला शिकलो. हे करताना मी सर्पमित्र कधी झालो हे मला देखील कळले नाही. सृष्टीचे देखील तसेच, ती माझी बालमैत्रीण, अनेकदा आम्ही सापांना सोबत पकडायचो. एकदा सर्पमित्र अशी ओळख तयार झाली की अनेक ठिकाणाहून रात्री-अपरात्री फोन यायचे. हळूहळू सापासोबतच काही जखमी वन्यजीव कोणाला दिसले की, ते आम्हाला सांगायचे. लहानपणी कुत्रा, मांजर यांना पकडून मी घरी आणायचो, त्यांच्यावर औषधोपचार करायचो, हा अनुभव गाठीला होता. त्यातूनच जखमी, आजारी वन्यजीवांच्या पुनर्वसनासाठी काम करण्याची भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली. पुढे काम करत-करत आता आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत, असे सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे सांगतात.
दानशूर व्यक्तींकडून वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मदतीची गरज -