महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये कार्यकर्त्यांची समजूत काढत अमरसिंहांनी सुरू केला सोनवणेंचा प्रचार; म्हणाले घड्याळ हाच आमचा उमेदवार - Beed Lok Sabha Constituency

बीड लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने अमरसिंह पंडित यांचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. मात्र, शनिवारी अमरसिंह पंडित यांनी आपल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करून पाटोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेला हजेरी लावली आणि बजरंग सोनवणे यांचा प्रचार सुरू केला

बीड

By

Published : Mar 17, 2019, 5:33 AM IST

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, अचानक शुक्रवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बजरंग सोनवणे यांचे नाव बीडच्या जागेसाठी जाहीर केले अन् अमरसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. एवढेच नाही तर शनिवारी गेवराई येथे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार सभा ठेवली होती. मात्र, ऐनवेळी ती रद्द करावी लागली.

बीड लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने अमरसिंह पंडित यांचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. मात्र, शनिवारी अमरसिंह पंडित यांनी आपल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करून पाटोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेला हजेरी लावली आणि बजरंग सोनवणे यांचा प्रचार सुरू केला. यावेळी ते म्हणाले, घड्याळ हाच आमचा उमेदवार आहे. त्यामुळे आम्ही सर्व ताकतीनिशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहोत.

बीडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे. शनिवारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, अमरसिंह पंडित यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली नाही. यावर नाराज असलेले पंडित व त्यांचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष होते. मात्र, शनिवारी अमरसिंह पंडित यांनी नाराज असलेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करून त्यांची समजूत काढली व बजरंग सोनवणे यांचा प्रचार केला.

विशेष म्हणजे शनिवारी सकाळी १० वाजता दस्तुरखुद्द विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या निवासस्थानी गेले व त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर माजी आमदार अमरसिंह पंडित व धनंजय मुंडे हे प्रचारासाठी बाहेर पडले. त्यांनी पाटोदा येथे जाहीर सभा घेऊन उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार सुरू केला.

एकंदरीत अशी परिस्थिती असली तरी गेवराई तालुक्यात अमरसिंह पंडित यांना उमेदवारी न दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत रोष असल्याचे चित्र आहे. या सगळ्या परिस्थितीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व उमेदवार बजरंग सोनवणे काय तोडगा काढतात हे पाहण्यासाठी थोडा वेळ जावा लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details