बीड : १७ ऑगस्टला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेनंतर आज (रविवार, २७ ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये सभा होतेय. अजित पवार यांच्या या सभेला राज्याच्या मंत्रीमंडळातील काही मंत्रीदेखील उपस्थिती लावणार आहेत. या सभेसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने तयारी केलीय. शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय.
शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा : अजित पवारांच्या या सभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली. यावेळी बोलताना त्यांनी या सभेचा उद्देश सांगितला. बीड जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित पवार ही सभा घेत असल्याचं राजेश्वर चव्हाण म्हणाले. 'बीड जिल्ह्यात जे प्रश्न आहेत, ते प्रश्न मांडण्यासाठी बीडची जनता येथे येणार आहे. या सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील अशी आमची अपेक्षा आहे', असं राजेश्वर चव्हाण यांनी सांगितलं.
रोजगार निर्मितीसाठी निर्णय घ्यावेत : 'बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. तो दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास व्हावा. तसेच जिल्ह्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी सरकारने निर्णय घ्यावेत', अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी नसल्यामुळे रोजगार निर्मितीसाठी सुद्धा निर्णय घ्यावेत अशी बीडच्या नागरिकांची मागणी आहे. 'बीड जिल्ह्यात एमआयडीसी झाली पाहिजे अशी मागणी पूर्वीपासून आहे. या सभेद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे हा प्रश्नही मार्गी लावतील', असा विश्वास यावेळी समर्थकांनी व्यक्त केला.
लाखोच्या संख्येने लोक जमतील : अजित पवार हे एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात गेल्यानंतर उपमुख्यमंत्री बनले. तर बीडमधील त्यांचे खंदे समर्थक धनजंय मुंडे यांना कृषीमंत्रीपद मिळाले. यानंतर त्यांना जिल्ह्यातील लोकांना भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे एक, दोन लोकांनी भेटण्यापेक्षा लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी एकत्र येऊन त्यांना भेटू शकतील, त्यासाठी ही सभा असल्याचे राजेश्वर चव्हाण म्हणाले.
हेही वाचा :
- Ajit Pawar Rally In Beed : 'बाप तो बाप असतो'...अजित पवार यांच्या बीडमधील सभेपूर्वी लागले बॅनर
- Dhananjay Munde : शरद पवार आमचे पांडुरंग, शेवटच्या श्वासापर्यंत...; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण