बीड - दहावी परीक्षेच्या केंद्र परिसरात एअरगन बाळगणाऱ्या तरुणास बंदोबस्तावरील पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई तालुक्यातील म्हाळस जवळा येथील हायस्कूल परिसरात शुक्रवारी करण्यात आली. परीक्षा केंद्रावर चक्क एअरगन आढळल्याने खळबळ उडाली आहे. संग्राम संजय नागरगोजे (वय - २०, रा. वडगाव गुंदा ता. बीड) असे या तरुणाचे नाव आहे.
संग्रामचा भाऊ दहावीची परीक्षा देत आहे. शुक्रवारी हिंदीचा पेपर होता. भावासोबत संग्राम नागरगोजे हा देखील आला होता. दरम्यान, म्हाळस जवळा येथील हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी पिंपळनेर ठाण्याचे पो. ना. विजय गायकवाड व पो.कॉ. राम कडुळे हे होते. परीक्षा सुरु असताना केंद्राच्या आवारात परीक्षार्थींचे नातेवाईक ठाण मांडून होते. यावेळी संग्राम नागरगोजे हा कंबरेला एअरगन लावून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यास लगेचच ताब्यात घेऊन त्याच्याकडील एअरगन ताब्यात घेण्यात आली.