आष्टी-रेल्वे हा बीड जिल्ह्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न हळूहळू मार्गी लागला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्यास तब्बल पंचवीस वर्षाहून अधिक काळ गेला. या काळात अनेक राजकीय आंदोलने झाली. मात्र रेल्वेचे स्वप्न हे स्वप्नच राहत होते. हेच बीड जिल्ह्यातील जनतेचे रेल्वेचे स्वप्न शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी पूर्ण होत आहे. नगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होत आहे. याचा लोकार्पण सोहळा आष्टी येथे होत आहे (Ahmednagar Ashti Railway). याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनकुमार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे हे उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी अनेकवेळा या रेल्वे उद्घाटनाचे मुहूर्तठरले होते. मात्र ऐनवेळी लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला होता. नगर परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेचा शुक्रवार हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा दिन ठरणार आहे. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.