बीड: आयोजक असलेले सुभाष साळवे यांना तर चक्क खांद्यावर घेत डान्स केल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मग कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे की अधिकाऱ्यांना डान्स करण्यासाठी असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले होते. कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी असा प्रकार केल्याने यांच्यावर कार्यवाही होते का, हे सुद्धा पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
शेतकऱ्यांचा संताप: बीड शहरांमध्ये कृषी महोत्सव सध्या साजरा होत आहे. या ठिकाणी आर्केस्ट्रा आयोजित केलेला होता आणि त्याच आर्केस्ट्रामध्ये या अधिकाऱ्यांनी डान्स केले आहेत ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. हेच अधिकारी शेतकऱ्यांचे मार्गदर्शक आहेत. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांना माहिती करून देणे, शेतकऱ्यांची प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हे या अधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र कर्तव्य सोडून त्यांनी एखाद्या लावणीच्या फडामध्ये डान्स केल्यासारखा या ठिकाणी डान्स केलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे. याच बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपूर्वी पोखरा योजनेचे पैसे मिळत नाहीत म्हणून एका व्यक्तीने आपले जीवन संपवले आहे. एकीकडे हे अधिकारी मात्र लावणीवर डान्स करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशीच मागणी शेतकरी मोहन गुंड यांनी केली आहे.
हाच का कृषी महोत्सव? राज्यात आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख पुढे येते. मात्र त्याच बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीच्या कृषी महोत्सवात स्वर झंकार कार्यक्रमाच्या नावाने आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावण्या, हिंदी गाण्यांवर धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान "अभी जिंदा हु तो जी लेने दो" या गाण्यावर गेवराईच्या तालुका कृषी अधिकाऱ्यासह इतर अधिकाऱ्यांनी डोक्यावर बॉटल घेऊन डान्स केला. तर "चंद्रा" या लावणीवर आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी चक्क तोंडात फुल घेऊन कार्यक्रमाच्या नावावर धिंगाणा घातला. खरे पाहिले तर यांचा हा धिंगाणा पाहून, नेमकं हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे की, अधिकाऱ्यांना आपली नाचण्याची हौस भागवत धिंगाणा घालण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.