बीड - धनंजय मुंडे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी पंकजा मुंडे यांनी अखेर मौन सोडले आहे. मी जो विचार करते तो जनतेच्या हिताचा करते. असे असतानाही माझ्या बाबतीत अत्यंत गलिच्छ प्रकारचे वक्तव्य केले जातात. धनंजय मुंडे यांनी आता तरी खोटे बोलणे सोडावे, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात अनेक चढउतार मी पाहिलेले आहेत. राजकारणात स्पर्धा पाहिलेली आहे. मात्र गलिच्छ राजकारण मी कधीच केले नाही. कधीकधी हे राजकारण सोडून द्यावा असा विचार मनात येतो पण मला उपेक्षित, दुर्लक्षित जनतेच्या माझ्या कडून असलेल्या अपेक्षा आठवतात. शेवटी निसर्ग न्याय करत असतो. मी देखील यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हारलेली आहे. पण अशा पद्धतीने आक्रमक होऊन कुणाविषयी चुकीचे वक्तव्य मी कधी केले नाही.