बीड- वंचित बहुजन आघाडी व संघर्ष समिती यांच्यावतीने 25 ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी भगवान गडाच्या पायथ्याशी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांचा मेळावा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांनी बुधवारी (दि. 21 ऑक्टोबर) एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दसऱ्याच्या दिवशीच भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा घेणे म्हणजे माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भविष्यातील राजकारणासाठी आव्हान आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आतापर्यंत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी व त्यांच्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीच गड व गडाच्या पायथ्याशी दसऱ्याच्या निमित्ताने ऊसतोड मजुरांचा मेळावा घेतला आहे. मात्र, यंदा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ऊसतोड मजुरांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. बहुजन वंचित आघाडी यांच्याबरोबरच संघर्ष समिती एकत्रित येऊन बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांचा संप तीव्र करत आहे. याचाच एक भाग म्हणजे 25 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर भगवान गडाच्या पायथ्याशी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ऊसतोड मजुरांचा मेळावा होत आहे.
गृह विभागाची परवानगी मिळू अथवा न मिळो मिळावा घेणारच