बीड -बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची नुकतीच निवडणूक झाली. परंतु, संचालक मंडळाचे कोरम पूर्ण न झाल्याने नवीन संचालक मंडळ स्थापित होऊ न शकलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली आहे. प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद विभागाचे अपर आयुक्त अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा -बीडमध्ये एचआयव्ही बाधित मुलांच्या आरोग्यासाठी बारगजे दाम्पत्यांचा संघर्ष
बीड जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. भाजपच्या ताब्यात असलेली बीड जिल्हा बँक त्यांच्या ताब्यातून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन खेळी केली होती. अनेक मतदारसंघात उमेदवारच मिळाले नाहीत. परिणामी, बीड जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. यामध्ये प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद विभागाचे अपर आयुक्त अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासोबत प्रशासक मंडळात शिखर बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, सनदी लेखापाल जनार्दन रणदिवे, सहाय्यक निबंधक अशोक कदम आणि ॲड. अशोक कवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.