बीड - जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी १ उपजिल्हाधिकारी आणि २ तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे. जिल्ह्यातील चारा छावण्या, वाळू आणि टँकर या कामांमध्ये अनागोंदी कारभार केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कामातील निष्काळजीपणा नडला, बीडमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यासह २ तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे - अविनाश शिंगटे
महसूल विभागात मागील काही महिन्यांमध्ये चुकीच्या बाबी घडल्याचे समोर आले आहे. याला आळा घालण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १ उपजिल्हाधिकारी आणि २ तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे.
महसूल विभागात मागील काही महिन्यांमध्ये चुकीच्या बाबी घडल्याचे समोर आले आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. निलंबन प्रस्ताव पाठवलेल्यामध्ये उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यासह बीडचे तहसीलदार अविनाश शिंगटे आणि पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक यांचा समावेश आहे. मुळे आणि शिंगटे यांच्यावर चारा छावण्या, वाळू आणि पुरवठा विभागातील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका आहे. तर चित्रक यांच्यावर कार्यालयीन कामकाजात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय तहसीलदार शिंगटे यांच्यावर बीड तहसीलमधील पुरवठा विभागात सुरू असलेल्या अनागोंदीला लगाम लावण्यात कसूर केल्याचा ठपका आहे. त्यांनी बीडच्या गोदाम व्यवस्थापकावर वेळेत कारवाई केली नाही, धान्याच्या वितरणाकडे लक्ष दिले नाही, असा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिला होता. त्याचाही उल्लेख या निलंबन प्रस्तावात करण्यात आला आहे.
मुळे यांच्यावर वाळू, छावण्यासह निवडणूक कामात केलेले दुर्लक्ष आणि कार्यालयीन कामातील निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. सतत वादात असलेल्या पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक यांच्यावर कार्यालयीन कामकाजाकडे दुर्लक्ष, अधिकारांचा गैरवापर करून बदल्या करणे, कर्मचाऱ्यांशी अरेरावी, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या प्रस्तावांवर आता विभागीय आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.