बीड -आदित्य संवाद या यात्रेच्या निमित्ताने बीडमध्ये आलेल्या आदित्य ठाकरेंनी येथील महिलांशी व मुलींसोबत संवाद साधला. सर्वांच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणी समजून घेण्यासाठीच मी बीडला आलो आहे, असे सांगत शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी बीडकरांशी संवाद साधला. यावेळी फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
आदित्य ठाकरेंनी बीड येथे महिला व मुलींसोबत संवाद साधला - sanvad yatra
राजकारण बाजूला ठेवून नागरिकांशी मी संपूर्ण राज्यात संवाद साधत आहे. तुमच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणी समजून घेण्यासाठीच मी बीडला आलो आहे, असे सांगत शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी बीडकरांशी संवाद साधला.
एकूण 35 मिनिटे चाललेल्या या कार्यक्रमात महिला आणि मुलींनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारले. यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन, महिला अत्याचार विरोधी कायदा, अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेत सामावून घेणे, महिला व मुलींची छेडछाड तसेच मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याबाबतच्या विविध विषयावरील प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी उत्तरे दिली. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे बीड जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.