बीड - जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक लातूर यांनी हा निर्णय घेतला. शेतकरी सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी आलेल्या कोट्यावधी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वाटप न करता ठेवीदारांना वाटप केला असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. तसेच बँकेचे मुख्याधिकारी विकास देशमुख यांनाही बडतर्फ करण्यात आले. आदित्य सारडा हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. याप्रकरणात कायदेशीर सल्ला घेऊन सहकार मंत्री यांच्याकडे अपील करणार असल्याचे आदित्य सारडा म्हणाले.
मागील 18 महिन्यांपासून हे प्रकरण सहनिबंधक लातूर यांच्याकडे सुरू होते. सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांच्या तक्रारीवरून विभागीय उपनिबंधक लातूर यांनी हा निर्णय दिला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना आदित्य सारडा म्हणाले, या प्रकरणात मी सहनिबंधक लातूर यांना खुलासा केलेला आहे. मात्र, माझा खुलासा विचारात न घेताच त्यांनी निर्णय दिला आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. या प्रकरणात आम्ही सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करणार आहोत. कारण जिल्हा बँक थेट शेतकऱ्यांना कर्ज न देता अगोदर सोसायटीला देते आणि सोसायटी स्वतः एक स्वायत्त संस्था आहे. असे असतानाही चुकीच्या पद्धतीने आमच्यावर आरोप केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.