बीड -गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांनी माझ्यावर अन्याय होत असल्यामुळे यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार असल्याची गर्जना करत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी भाजपला शिव्या देत तशी मानसिकता निर्माण करून घेतली. मात्र, थोड्याच दिवसात ही भूमिका बदलत पंकजा मुंडेनी पुन्हा मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. 27 जानेवारीला होणारे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आंदोलन भाजपचे की प्रतिष्ठानचे हे स्पष्ट न झाल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
पंकजा मुंडे यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात; बंड थंड झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांनी माझ्यावर अन्याय होत असल्यामुळे यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मात्र, थोड्याच दिवसात भूमिका बदलत पंकजा मुंडेनी पुन्हा मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे, यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
भाजपकडून ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याची टीका करत त्यांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याला कार्यकर्त्यांनी भावनिक प्रतिसादही दिला. यापुढे भाजप नव्हे तर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून जनसेवा करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली होती. औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 27 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली. पंकजा मुंडेच्या या मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भातील लाक्षणिक उपोषणाला 'मी येणार ..तुम्हीही या ....अशी पूर्वीच्या स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहनही केले आहे. मात्र, हे उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे की भाजपचे असा प्रश्न पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांसमोर पडला आहे.
या उपोषणाच्या वेळी ज्या देवेंद्र फडणीसांवर पंकजा मुंडे यांनी टीका केली होती, तेच आता सहभागी होत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कार्यकर्ते या उपोषणात सहभागी होणार आहेत. एकंदरीत भाजपने हे उपोषण हायजॅक केले की पाणीप्रश्नी पंकजा मुंडे भाजपच्या ओंजळीने पाणी पीत आहेत, असा प्रश्न पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांसमोर पडला आहे. पंकजा मुंडे भावनिकतेच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांचेच बूमरँग करत असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. एकंदरच या सर्व प्रकारांमधून कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.