माजलगाव : बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई केली. मंगळवारी (दि.२३) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पुरुषोत्तमपुरी (ता.माजलगाव) येथे धाड टाकून पथकाने एक जेसीबी व तीन हायवा टिप्पर पकडले.
०१ कोटी ३५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त -
पुरुषोत्तमपुरी (ता.माजलगाव) येथे गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी सहकाऱ्यांसोबत मध्यरात्री येथील नदीपात्रात सापळा रचला. त्यानुसार, पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एक जेसीबी व तीन हायवा टिप्पर वाळू उपसा करुन वाहतूक करताना पकडले. या चारही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत ०१ कोटी ३५ लाख रूपयांच्या मुद्देमालासह चारही आरोपींना ग्रामीण ठाण्यातील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तर, या वाहनांच्या मालकांसह एकूण आठ जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.