बीड- जिल्ह्यातील नेकनूर जवळ एका 22 वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला करून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून रविवारी सायंकाळी या आरोपीला पकडण्यात आले. अॅसिड हल्ल्यात गंभीररित्या भाजलेल्या मुलीचा उपचारादरम्यान रविवारी दुपारी बीडच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अविनाश राजुरे (रा. शेळगाव जि. नांदेड) असे अॅसिड हल्ला केलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत सावित्री आणि आरोपी अविनाश हे दोघेही देगलूरच्या शेळगावचे रहिवासी होते.
पुण्याहून परतताना बीड जिल्ह्यात केला होता अॅसिड हल्ला
आरोपी आणि सावित्री हे प्रेमीयुगुल पुण्याहून गावी परत येत होते. त्यावेळी अॅसिड हल्ल्याची ही धक्कादायक घटना घडली. देगलूर तालुक्यातील शेळगावातील अविनाश रामकिशन राजुरे हा आणि पीडित तरुणी हे दोघे जण दिवाळीसाठी गावाकडे परत येत होते. रात्र झाल्याने ते येळंबघाट परिसरात मुक्कामासाठी थांबले होते. पहाटेच्या सुमारास अविनाशने तरुणीच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकले. तसेच पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यानंतर त्याने गंभीर भाजलेल्या तरुणीला सोडून घटनास्थळावरुन पळ काढला होता. तर दुसरीकडे पोलिसांनी जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अॅसिड हल्ल्यानंतर आरोपीने गाठले देगलूर-
आरोपी राजुरे याने शनिवारी रात्री उशिरा प्रेयसी सावित्रा हिच्यावर जिल्ह्यातील नेकनूरगावाजवळील मांजरसुंबा केज मार्गावर येळंब घाटात ॲसिड टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या ॲसिड हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मागील पंधरा तासांपासून नेकनूर पोलीस अविनाश राजुरे याचा शोध घेत होते.