बीड -स्पर्धा परीक्षेचा वर्ग करुन गावी परतताना आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवताना एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. खाली कोसळल्यानंतर पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उशीर शहरातील बार्शी नाक्यालगत घडली.
कुत्र्याला वाचवताना दुचाकीचा अपघात, तरुण जागीच ठार - Accidental death of young man
स्पर्धा परीक्षेचा वर्ग करुन गावी परतताना एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. रस्त्यात कुत्रे आडवे आल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला व रस्त्यावर कोसळला. मागून आलेल्या वाहनाने चिरडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. या विषयी आधीक तपास पोलीस करत आहेत.
आकाश नवनाथ सारुक (वय.२०, रा. शिवणी ता. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. दुचाकीवरुन (क्र.एमएच २३- ६१४३) वरुन तो रोज गावाकडून शहरात ये- जा करत असे. रविवारी नित्याप्रमाणे शिकवणी वर्ग संपल्यानंतर तो दुचाकीवरुन एकटाच शिवणीकडे जाण्यास निघाला. बार्शी नाक्यालगत त्याच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रे आडवे आले. कुत्र्याला वाचवताना आकाशने ब्रेक दाबले. त्यानंतर तो खाली कोसळला. मात्र, त्याच्या मागे चिकटूनच एक चारचाकी वाहन येत होत. त्याचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तेथून जाणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक जाधव, डॉ. श्रीकांत मोराळे यांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र, काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर त्याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. पेठ बीड ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. संबंधित वाहनाचा शोध घेतला जाईल, असे निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले.