बीड - जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर रोडवर बर्दापूर पाटीनजीक कार, पिकअप टेम्पो आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडला. भुनम्मा सायन्ना शिरपे (वय 39) असे अपघातात मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते घाटनंदूर येथील शाळेत शिक्षक होते.
असा झाला अपघात -
भुनम्मा शिरपे हे शनिवारी रात्री दुचाकीवरून (एमएच 44 एल 7152) लातूरहून अंबाजोगाईकडे येत होते. ते बर्दापूर पाटीच्या थोडेसे पुढे आले असता, डिझायर कार (एमएच २० बीवाय 9787) आणि पोल्ट्रीच्या कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव पिकअप टेम्पो सोबत त्यांच्या दुचाकीचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात भुनम्मा शिरपे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित कुचेकर (रा. परळी वेस, अंबाजोगाई) आणि डिझायरचा चालक अशोक कदम (३०, रा. आपेगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातळीने स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.